shikshak AKOLA TIMES

आदर्श शिक्षक जयदीप सोनखासकर एक ध्येयवादी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व

  • आदर्श शिक्षक जयदीप सोनखासकर एक ध्येयवादी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व

आदर्श शिक्षक , अष्टपैलू व प्रभावी व्यक्तिमत्त्व मा.जयदीप सोनखासकर यांना  दि.०८ सप्टेंबर २०२१ ला असलेल्या ४८व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करुन देण्यासाठी हा लेखप्रपंच.

मूर्तिजापूर तालुक्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेले वडील शिक्षक, पत्रकार परंतु बारावीत असताना वडील वारल्यामुळे परिवारात सगळ्यात मोठे असल्यामुळे लहानपणीच परिवाराची जबाबदारी भाऊंना पेलावी लागली.दोन भाऊ,एक बहीण,आईसह कुटुंबाचा गाडा ओढत असताना त्यांना सर्व सुख सुविधा पुरवण्याची शिक्षण पूर्ण करण्याची,कमजोर असलेल्या घर परिवाराला समृद्ध करण्याचे स्वप्न अंगी बाळगून काम करीत राहिले. आपल्या सोबतच आपल्या भावंडा चे शिक्षण पूर्ण करणेसाठी अहोरात्र मेहनत करीत राहिले. आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करीत राहिले.

हे सांभाळत असताना त्यांचे एम.ए, बी.पी.एड.,डीसीएम, योगपदविका व पत्रकारिता पदविका असे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आपल्या सुस्वभावी स्वभावामुळे मूर्तिजापूर येथील इंदिरा गांधी नगर परिषद माध्यमिक विद्यालयात वीस वर्ष क्रिडा शिक्षक वा आता पाच वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या कल्पक विचारातून शाळेचा कायापालट झालेला आहे सर्व शिक्षक वृंद पालक व हितचिंतकांना सोबत घेऊन त्यांनी शाळेमध्ये अनेक वेगळे, वेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. जयदीप शंकराव सोनखासकर यांचे वडील,आई व आजोबा दौलतराव सुद्धा शिक्षक होते. भाऊ चे मूळ गाव सोनखास त्यांचा जन्म अंजनगाव सुर्जी येथे झाला आहे. तेथून संघर्ष करीत पुढील आयुष्य ते जगत राहाले व प्रगती करत राहिले. या दरम्यान १७ मे २००२ मध्ये उच्चशिक्षित सुस्वभावी अशा राजश्री मधुकरराव कोलखेडे दर्यापूर यांच्याशी विवाहबद्ध झाले.

संसाराचा गाडा ओढत असताना आपल्या परिवाराला सुद्धा ते सोबत घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी अहो रात्रंदिवस झटत राहिले. या दोघांचा संसार बहरत गेला त्या माध्यमातून मुलगी यशदा नुकतीच बारावी उत्तीर्ण होवून आभियांञिकी शिक्षणाकडे तर मुलगा पार्थ आठवी मध्ये शिकत आहे. हा सगळा परिवार सांभाळत असताना जयदीप सोनखासकर यांचा जिल्हाभर समाजसेवा, पत्रकारिता, क्रीडाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र,साहित्यक्षेञ यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करीत असल्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा त्यांचा मोठा परिवार जिल्हाभरच नव्हे तर महाराष्ट्रात निर्माण झाला आहे.

त्यांच्या सुखदुःखात सुद्धा ते नेहमी सहभागी असतात.युवक असताना नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून तालुका स्तरावर शाखा तयार करणे, विविध कार्यक्रम घेणे, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेत- घेत ते पुढे चालत राहिले. त्यासोबत पत्रकारिता, सत्यशोधक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, साहित्य चळवळ, शेतकरी चळवळ, वेगळ्या विदर्भाची चळवळ, आदी अनेक चळवळीच्या माध्यमातून आपले सामाजिक काम करीत राहाले. व त्या माध्यमातून त्यांचे एक चांगले व्यक्तिमत्व घडत राहिले. अडल्या-नडल्या गरजवंतांना नेहमी त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. कर्मयोगी गाडगे महाराज व गुरूवर्य संत वासुदेव महाराज यांच्या विचाराचा वारसा यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे.आपली आई श्रीमती निर्मलाबाई यांना ते आदर स्थान व प्रेरणा स्थान मानतात. त्यांच्यामुळे व परिवारातील इतर सदस्यांमुळे ते स्थानिक सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय राहिले आहेत.

पत्रकारितेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे. शिक्षण या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा वारसा त्यांना आपल्या आजोबा, वडील यांच्याकडून मिळालेला आहे. अण्णा हजारेंची चळवळ भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मध्ये त्यांनी सक्रिय पणे कार्य केले आहे . अनेक आंदोलने, मोर्चे धरणे,पदयात्रा,जाहीर सभा आदी च्या आयोजन नियोजनामध्ये मोठा सहभाग तन-मन-धना सह राहिलेला आहे.या माध्यमातून त्यांचे जीवन घडत गेले. व पुढे ते अनेक मोठमोठ्या सामाजिक संघटना चळवळीशी जुळत जाऊन कार्यरत राहिले त्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. शाम मानव प्रणित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, सत्यशोधक समाज तालुकाध्यक्ष, अंकुर साहित्य संघाचे तालुकाध्यक्ष ते केंद्रीय उपाध्यक्ष पर्यंत कार्यरत राहिले.मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, मराठा युवा संघ, संभाजी ब्रिगेड आधी संघटनेसोबत शाहू महाराज विचार मंच तालुकाध्यक्ष, ग्राम सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघाचे प्रवक्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेसोबत ते कार्यरत राहिले आहेत तर आता ते जिल्हा विभागीय व राज्य स्तरावरील संघटने सोबत जुळलेले आहेत.

त्यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या अमरावती विभाग कार्यवाह, शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ चे अमरावती विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.याशिवाय संस्थापक-संपादक ‘शिक्षक मत’ मासिक, विश्वस्त संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था श्रद्धा सागर अकोट,अकोला जिल्हा आट्यापाट्या, नेटबॉल, लगोरी, रोपस्किपींग,सायकल पोलो,फुटबॉल टेनीस असोसिएशन चे सचीव,पोणी साॕफ्टबाॕल असोसिएशन चे अकोला जिल्हाध्यक्ष ,अकोला जिल्हा टेनीसव्हॉलिबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष आधी संघटनेचे पदाधिकारी आहेत.टेनिस हॉलीबॉल असोसिएशनच्या अमरावती विभागीय सचिव म्हणून तर संकल्प क्रीडा मंडळ मुर्तीजापुर चे संस्थापक सचिव म्हणून भूमिका पार पाडीत आहेत.

निर्भय बनो जनआंदोलन, नेहरू युवा केंद्र परिवार, विविध पत्रकार संघटना, शासनाच्या विविध शासकीय समितीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे.याच्या माध्यमातून आपल्या शिक्षक बांधवांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत असतात. निवेदने ,धरणे, मोर्चे काढून तसेच वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे ते सातत्याने कार्य करीत आहेत. त्यांच्या सामाजिक व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याचा लेखाजोखा खूप मोठा आहे.त्यांच्या या कार्याला पाहून विविध सामाजिक संस्था संघटनांनी व शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सेवाश्री परिवारातर्फे संघर्ष पुरस्कार1994 ला त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना मिळालेला आहे. युवकांच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल नेहरू युवा केंद्र अकोला च्या १९९५-९६ जिल्हा युवा पुरस्काराने ते सन्मानित झाले आहे. अंकुर साहित्य संघाच्यावतीने अंकुर शोध पत्रकारिता पुरस्कार हे त्यांना १९९९ ला त्यांना मिळालेला आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने २००४ मध्ये क्रिडा क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यानंतर २०१४-१५ मध्ये संघटक कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत त्यांना मिळालेला आहे. त्या नंतर सन २०१७-१८ यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येऊन गौरवण्यात आले आहे.

तसेच क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्राच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०१९ यांना देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने २००३ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड त्यांना देण्यात आलेला आहे.तसेच जिल्हास्तरीय कृतीशील आदर्श पुरस्कार २०१७-१८ मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अकोला च्या वतीने देण्यात आला आहे. अंकुर रत्न पुरस्कार २००५ ला साहित्य संघाच्या वतीने त्यांना देऊन गौरवण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. संत गाडगे बाबा कर्मभूमी पुरस्कार नेहरू युवा मंडळाच्यावतीने देऊन त्यांना गौरवित केले आहे. तसेच श्री रोकडोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदपूरजि. लातूर तर्फे २०१९मध्ये शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. २०२० मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार महिला व अपंग बाल विकास संस्था ठाणे – मुंबई च्या वतीने देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. अशा अनेक पुरस्कार त्यांना आपल्या जीवनामध्ये मिळाले असले तरी ते जमिनीवर राहुन अजूनही सातत्याने काम करीत आहेत.

कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये अहंभाव नसतो. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नेहमी समाजामध्ये कार्यरत असतात. शाहू,फुले आंबेडकर, गाडगे महाराज,तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन ते आजही समाजामध्ये कार्यरत आहेत.प्रसिद्धीच्या मागे न लागता ते आपले सातत्याने काम करीत असतात, कामामध्ये राम आहे हे त्यांनी जाणले आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा अनेक माध्यमांतून उमटवलेला आहे त्यामध्ये साहित्य, पत्रकारिता, समाज सेवा करीत असताना त्यांचे प्रकाशित झालेले सोनचाफा प्रातिनिधिक काव्यसंग्रह, मी माझा कसा? चारोळी संग्रह हे प्रकाशित झालेले आहेत. तसेच लेख व कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

त्यांनी आपल्या जीवनाची सुरूवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली आहे.त्यामध्ये दैनिक नवयुगप्रभा तालुका प्रतिनिधी, दैनिक देशोन्नती, दैनिक जनवाद, दैनिक भास्कर, दैनिक नवराष्ट्र, दैनिक विदर्भ मतदार, दैनिक विश्वशक्ती, दैनिक महासागर, दैनिक हिंदुस्थान मधील शिक्षणविश्व सदर सद्या सुरू आहे. दैनिक सकाळला ‘क्रीडा विश्व’ सदर त्यांनी सातत्याने एक वर्ष चालवले आहे. त्या माध्यमातून सुद्धा जनता व शासन यांच्यात समन्वय करण्याचे काम त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीतून केले आहे.

जयदीप सोनखासकर यांना जे अनेक पुरस्कार मिळाले त्या पुरस्काराचा निधी स्वतः न घेता आपण ज्या शाळेमध्ये कार्यरत आहे त्या शाळेला देणगी देऊन विविध पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या १,०००००लाख व स्वतः जवळचे ५०००० हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये शाळेच्या विकास कामासाठी दिले व त्या माध्यमातून शाळेचा विकास केला. तसेच आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई दत्तक पालक योजना राबवण्यासाठी शाळेतील शिक्षक समाजातील दानशूर लोकांकडून निधी जमा करून सात लाख रुपये फिक्स डिपॉझिट करून त्याच्या व्याजावर दर वर्षी विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्याचे वाटप केले जात असते. त्यामध्ये सुद्धा त्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. माननीय जयदीप सोनखासकर यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपले मोठे काम उभे केले आहे त्या माध्यमातून सात शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन राज्यस्तरीय स्तरावर करून यशस्वी केले आहे.

स्वतः राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र संघाचे कर्णधार राहिलेले जयदीप यांनी ४००च्यावर राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत .सर्वसामान्य कुटुंबातील यातील ७ खेळाडू पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.तर ४० च्या वर विद्यार्थी खेळाडू इतर नोकऱ्यांमध्ये भाऊंच्या मार्गदर्शनात व खेळाच्या माध्यमातून लागलेले आहेत. आपल्या शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक व शिक्षण व्यवस्थेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २०१६ पासून ‘शिक्षण विश्व’ साप्ताहिक सदर चालवून शिक्षण क्षेत्राचे अनेक प्रश्न जनतेच्या व शासनाच्या दरबारात मांडलेले आहेत.त्या माध्यमातून अनेक वेळा शिक्षकांना न्याय सुद्धा मिळाला आहे.शिक्षणाची कास धरीत,आपल्या सोबत आपल्या भावंडांना, स्वतःच्या पत्नीला सुद्धा पुढील शिक्षण घेता यावे म्हणून पुढाकार घेऊन सातत्याने त्यांना सहकार्य केले आहे पत्नीला प्राथमिक शिक्षिके पासून ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने सहकार्य केले आहे. व आज त्या अमरावती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

एक सामान्य युवक ते आज भरभराटीला पावलेले, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जयदीप सोनखासकर होय. समाज सेवक, शिक्षक, क्रीडाप्रेमी, शेतकरी, सत्यशोधक, पत्रकार, वक्ता, लेखक, कवी एक संवेदनशील असलेला माणूस म्हणून तें खूप मोठे कार्य करीत आहेत. आपल्या वडिलांच्या निधनानंतर अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देऊन दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्यांचा मेळावा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या लोकांचा गुणगौरव करण्यात येत असतो व त्या निमित्ताने स्वर्गीय शंकरराव दौलतराव सोनखासकर स्मृती प्रित्यर्थ स्थापित समर्पण प्रतिष्ठान द्वारा विदर्भस्तरीय समर्पण पुरस्कार देऊन अनेक गणमान्य व्यक्तींना गौरविण्यात आले आहे.

व हा उपक्रम सध्या ही सातत्याने चालू आहे .याच्या माध्यमातून समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक लोकांना गौरविण्याचा मानस आहे . जीवनामध्ये माणसाने ध्येय ठेवल्याशिवाय प्रगती होत नाही. प्रगती करायची असेल तर कर्म केल्याशिवाय त्याला पर्याय नाही हा मूलमंत्र त्यांनी अंगाशी बांधून सातत्याने कार्यरत राहतात. त्या माध्यमातून जीवनात आल्यानंतर समाजासाठी काहीतरी केले पाहिजे समाजाला काहीतरी दिले पाहिजे या उद्देशाने त्यांनी अनेक सामाजिक कामे आपल्या हातून केले आहे पुढे सुद्धा यांचा मोठा संकल्प केला आहे. त्यामध्ये समाजातील गोरगरीब व शेतकरी आत्महत्या ग्रस्त विद्यार्थी साठी शैक्षणिक सुविधांसह त्यांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची संपूर्ण व्यवस्था भूमिपुत्र अभियानाअंतर्गत करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

त्यामाध्यमातून गोरगरीब,निराधार,निराश्रित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी यांच्या संपूर्ण शिक्षणाची राहण्या-जेवणाची व्यवस्था ते करणार आहेत. अशाप्रकारच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोबत संपर्क साधावा या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा व जीवनामध्ये पुढील जीवनात प्रगती करण्याच्या सुविधा पुरवणार आहेत तरी अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपला विकास करून घ्यावा. असे या लेखाच्या निमित्त आव्हान करण्यात येत आहे.शेती व शिक्षण हे जयदीप सोनखासकर यांचे जिवघर आहे त्यासाठी पुढील काळात सातत्याने काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. हा प्रकल्प त्यांनी सिरसो मुर्तिजापूर जि.अकोला येथे १एकर जागेवर उभारणी सुरू केलेआहे.

लवकरच तो पूर्णत्वास जाईल. अशाप्रकारे आपल्या ४८व्या वाढदिवसा निमित्त संकल्प करणारे ते एकमेव समाजसेवक ठरले आहे. स्वतः गरिबीतून पुढे आल्यामुळे त्यांना गरीब लोकांच्या समस्यांची जाण असून त्यांच्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. कोणताही बडेजाव पणा न करता, आपल्या सेवावृत्तीचे दर्शन ते नेहमी देत असतात अशा अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे. परंतु त्याचा कुठेही उल्लेख न करता ते आपलं सातत्याने कार्य करीत असतात. विविध जिल्ह्यातील सामाजिक संस्था संघटना सुद्धा त्यांचे नेहमी तन-मन-धनाने सहकार्य व मार्गदर्शन घेत असते. मी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची चळवळ अकोला जिल्ह्यात चालू केल्यावर त्या वेळेस सुद्धा त्यांनी त्याचे मोठे योगदान दिले आहे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे जयदीप सोनखासकर होत.त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांचे कोटी कोटी अभिनंदन व पुढील सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक कार्यासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा.

समाजसेवक गजानन ओंकार हरणे,
मो.९८२२९४२६२३.

 

One thought on “आदर्श शिक्षक जयदीप सोनखासकर एक ध्येयवादी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व

  1. Pingback: रोहित शेट्टीने विमानतळ आणि जिम लूकबद्दल आपली प्रतिक्रिया दिली, - AKOLA TIMES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!